Home देश-विदेश China J-20 Fighter Jets: चीनकडून 12 ‘मायटी ड्रॅगन’ भारताच्या दिशेनं तैनात; J-20च्या...

China J-20 Fighter Jets: चीनकडून 12 ‘मायटी ड्रॅगन’ भारताच्या दिशेनं तैनात; J-20च्या आडून LAC जवळ चीनचा ‘स्टील्थ गेम’

3

China J-20 Fighter Jets: भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या परिसरातील हवाई तळांवर लक्षवेधी घडामोडी सुरू आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून त्यांचा उलगडा झाला आहे.

बीजिंग: चीन भारताविरोधात लष्करी पातळीवर मोठ्या हालचाली करत असल्याची माहिती फोटोंसह समोर आली आहे. चीननं भारतीय सीमेच्या जवळ असलेल्या दोन हवाई तळांवर किमान १२ अत्याधुनिक जे-२० स्टील्थ लढाऊ विमानं तैनात केली आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास चीननं पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पाचव्या पिढीतील लढाऊ विमानं इतक्या मोठ्या संख्येनं तैनात केली आहेत. विशेष म्हणजे सगळी विमानं भारताच्या दिशेनं तैनात करण्यात आलेली आहेत.

कमर्शियल सॅटेलाईट कंपनी वेंटोरनं चिनी लढाऊ विमानांचे फोटो टिपले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सनं शिनजियांगच्या होटन आणि तिबेटमधील डॅम्सुंग हवाई तळावर मोठ्या संख्येनं लढाऊ विमानं तैनात केल्याचं सॅटेलाईट फोटोतून स्पष्ट दिसत आहे. चीनच्या ताफ्यात असलेल्या J-20 ‘मायटी ड्रॅगन’चा समावेश पाचव्या पिढीतील अत्याधुनिक स्टील्थ लढाऊ विमानांमध्ये होतो. या विमानांची निर्मिती चेंगडु एअरक्राफ्ट कॉर्पोरेशननं केली आहे. ही विमानं रडारला सहज चकवा देतात. या विमानांमध्ये दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रं आणि अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. शत्रूच्या लढाऊ विमानांना आणि महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं J-20 विमानांची निर्मिती करण्यात आलेली आहे.