Home राजकीय Amit Shah: अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील राजकारण तापलं; काँग्रेसचा इशारा, पोलीस...

Amit Shah: अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील राजकारण तापलं; काँग्रेसचा इशारा, पोलीस अलर्ट मोडवर

3

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यानची सुरक्षा व्यवस्था, संभाव्य आंदोलने, कायदा व सुव्यवस्था; तसेच विविध संवेदनशील ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही बैठकीत भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय कलगीतुऱ्यामुळे शहरातील वातावरण तापले असून, पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेचे कडेकोट नियोजन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, त्यांच्या ‘व्हीआयपी’ ताफ्याला ‘खड्डे दर्शन’ होऊ नये यासाठी तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या संदर्भात तातडीची आढावा बैठक घेऊन शहा यांच्या संभाव्य प्रवासाच्या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते चकाचक करण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे