
दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील हळदा-आवळगाव परिसरात दहशत निर्माण करणारी नरभक्षी T-120 वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून विधिमंडळ पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
९ जुलै २०२६ रोजी बल्लारपूर येथील अनिल भास्कर दिवटे (वय ३२) यांचा वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मृतकाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. याचवेळी त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नरभक्षी वाघीण तातडीने जेरबंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून आवश्यक ती सर्व यंत्रणा तत्काळ कामाला लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
या घटनेनंतर वाघीण शेतशिवार व गावालगतच्या परिसरात वारंवार वावरत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार वडेट्टीवार यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या शोधमोहिमेचा सातत्याने आढावा घेत अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवत कारवाईला गती देण्याचा आग्रह धरला.
अखेर २९ जुलै रोजी उपक्षेत्र आवळगाव, नियतक्षेत्र हळदा येथील कक्ष क्रमांक २२२ मध्ये वनविभागाच्या विशेष पथकाने T-120 वाघिणीला डॉर्ट मारून यशस्वीरीत्या बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे जेरबंद केले. उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय सी. मराठे तसेच R.R.T. पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
नरभक्षी वाघीण जेरबंद झाल्याने हळदा, आवळगाव आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळाव्यात, यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेत योग्य पाऊल उचलले त्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.























