Home महाराष्ट्र महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान महसूलमंत्री...

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते सन्मान

9

चंद्रपूरदि ऑगस्ट २०२६: महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेचा ‘एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती येथे शुक्रवारी (दि. २१) राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे अमरावती येथे शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन झाले. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर विचारमंथन झाले. सायंकाळच्या सत्रात ‘आयईआय’च्या वतीने जाहीर झालेला ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना महसूलमंत्री श्री. चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रवीण पोटे, आमदार श्री. प्रवीण तायडे, ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’चे (भारत) अध्यक्ष श्री. मनिष कोठारी, पदाधिकारी श्री. आनंद जवंजाळ, श्री. राम विघे, श्री. आर. आर. तंवर, श्री. सुनील राठी आदींची उपस्थिती होती.

‘अभियंता हे देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि मानवी प्रगतीचे शिलेदार आहेत. भारताच्या अभियंत्यांनी अफाट कौशल्याच्या जोरावर जगात अव्वल स्थान निर्माण केले आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते भारतात आहेत. विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांची अद्भूत कार्यक्षमता ऊर्जामंत्री म्हणून काम करताना मी जवळून अनुभवली आहे. एलिफंटा बेटासारख्या दुर्गम ठिकाणी समुद्रामधून भूमिगत वाहिनीद्वारे वीज पोहोचवण्याचे अशक्यप्राय आव्हान महावितरण व महापारेषणच्या अभियंत्यांनी लिलया पेलले. हा प्रकल्प म्हणजे भारतीय अभियांत्रिकीच्या कौशल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे!’ अशा शब्दांत महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभियंत्यांचा सन्मान केला. याआधीच्या सत्रात संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी विकसित भारत २०४७ चे ऊर्जा उद्दिष्ट: आधुनिक ऊर्जा सुलभतेचा आराखडा आणि महाराष्ट्राची आघाडी’ या विषयावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया’ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत. विद्युत क्षेत्रामधील ३७ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. राजेंद्र पवार यांचा या संस्थेकडून ‘एमिनेंट इंजिनियर’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

फोटो नेम- Shri . Rajendra Pawar Director HR MSEDCL 22-08-2026

फोटो ओळ – अमरावती येथे ‘एमिनेंट इंजिनियर’ हा पुरस्कार महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना प्रदान करण्यात आला.