
चंद्रपूर, दि. 29 : जल जीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण ग्रामसमुदायाकडे करण्याच्या उद्देशाने राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 2 ऑक्टोबर 2026 रोजी ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ‘हर घर जल’ घोषित झालेल्या गावांमध्ये ज्या गावांतील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे आणि पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या आहेत, अशा गावांमध्ये ‘जल अर्पण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामसभेतून पाणी पुरवठा योजनेबाबत तसेच पाणी गुणवत्ता या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ‘जल अर्पण’ कार्यक्रमाच्या दिवशी ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजना, तिचे हस्तांतरण तसेच योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात महिला बचत गट, युवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ, भजनी मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले जाणार आहे.
‘जल अर्पण’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीला ‘जल बंधन’ करण्यात येणार आहे. यामधून “आजपासून ही पाणीपुरवठा योजना गावाची असून, तिची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी गावाची राहील” असा संदेश पाणी पुरवठा विभागातर्फे ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. गावातील पाणीपुरवठा योजना केवळ शासनाची मालमत्ता न राहता ग्रामसमुदायाच्या सहभागातून तिचे योग्य व्यवस्थापन, देखभाल व संवर्धन व्हावे, हा ‘जल अर्पण’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
त्यामुळे सर्व पात्र गावांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करून गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्रामसेवक, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांनी 2 ऑक्टोबर रोजी ‘जल अर्पण’ कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले आहे.




















