Home Breaking News राजीव गांधी जयंतीनिमित्त RCERTमध्ये सद्भावना दिन उत्साहात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा...

राजीव गांधी जयंतीनिमित्त RCERTमध्ये सद्भावना दिन उत्साहात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; मान्यवरांकडून राजीव गांधींना अभिवाद

1

चंद्रपूर : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे सद्भावना दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. विज्ञान-तंत्रज्ञान, संगणकीकरण, दूरसंचार तसेच युवकांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. आधुनिक आणि प्रगत भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा देण्याचे कार्य केले. त्यांचा सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सद्भावना दिनानिमित्त सामाजिक ऐक्याचा संकल्प

समाजातील विविध घटकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाची भावना वृद्धिंगत करणे, तसेच जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे ही काळाची गरज आहे. समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम राखणे हीच स्वर्गीय राजीव गांधी यांना खरी आदरांजली ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट)चे माजी अध्यक्ष श्री. शफिक अहमद, सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट)चे अध्यक्ष श्री. विनोद दत्तात्रेय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. शिवा राव, सौ. कुंदाताई जेणेकर, सौ. चंदाताई वैरागडे, श्री. सुरेंद्र अडबाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. युवकांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. देवश्री कोडगिरे यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.