
तालुक्यात एमआयडीसीचा मुद्दा ऐरणीवर आहे.याला घेऊन शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आहे.हक्काची शेती जाणार,या भीतीने सारे त्रस्त आहेत.शेतकरी संघर्षासाठी तालुक्यात दोन समित्या कार्यरत आहे.मात्र स्वयंघोषित नेते आणि काही दलाल शेतकरी नेते असल्याचे भासवत एमआयडीसी सोबत शेतीच्या सौदेबाजीत गुंतल्याचे लक्षात आल्याने शेतकरी एकता संघर्ष कृती समितीत रोष पसरला आहे.याबाबत शनिवारी (दि.२२) समितीने पत्रपरिषद घेत याचा निषेध नोंदविला.दलालांना पाठीशी घालणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी एमआयडीसी बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी,असे आव्हाहन गोंडपिपरी विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत केले आहे.धानोरकर आणि धोटे यांनी गोंडपिपरीतील १२ गावांचा दौरा करावा आणि शेतकऱ्यांशी चर्चा करावी,असे आव्हाहनही पत्र परिषदेत शेतकऱ्यांनी केले आहे.ज्याची शेतीच गेली नाही,अश्या नेत्यांना आमच्या भावना काय कळणार ? असा टोलाही लगावला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील एमआयडीसीच्या न्यायालयीन लढ्याला यश आले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंडपिपरी एमआयडीसीला “स्टेटस को” दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला.आगामी काळात भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली.गोंडपिपरी एमआयडीसी सध्या गंभीर वळण घेत असतांना या विषयाला घेऊन मते मतांतरे आहेत.दोन कृती समिती शेतकरी हितासाठी कार्यरत आहेत.मात्र काही दलाल सौदेबाजीत गुंतल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आल्याने शेतकरी दुखावले.यावर समितीने पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.पॅकेज ठरवणारे हे भामटे आहेत तरी कोण ? यांना हा अधिकार कुणी दिला ? असा जॉब विचारत या दलालांना पाठीशी घालणाऱ्या खासदार धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रभावित १२ गावांचा दौरा करावा,तेथील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्या,असे आव्हाहन शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.१७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत “पॅकेज” बाबत झालेली चर्चा ही शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे,असे मत यावेळी पत्र परिषदेत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.विधिमंडळ आणि न्यायालयीन लढाई सुरू असून प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू,लाठ्याकाठ्या खाऊ,मात्र हक्काची शेती देणार नाही,असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष मारोती भोयर,सचिव माधव लडके,कोअर कमिटी सदस्य कमलेश निमगडे,राजेश कवठे,शालिकराम माऊलीकर,अँड.सचिन फुलझेले,रामदास मोहुर्ले,अतुल झाडे,अमित भसारकर,सुदर्शन दुर्गे,विपिन मोरे,राहुल सोनटक्के,गजानन ढवस,संतोष निकोडे,सुनील पूडके आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
——————————
बॉक्स
* विनामूल्य लढाईसाठी वकिलांचा सत्कार ;
संघर्षाच्या सुरवातीपासून विनामूल्य न्यायालयीन लढाई लढणाऱ्या अँड.दीपक चटक आणि अँड.बोधी रामटेके यांचा बैठकीत सन्मान करण्यात आला.भविष्यातील विधिमंडळ,न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाईसाठी आम्ही सज्ज असल्याचे मत सत्काराला उत्तर देताना दोनही वकिलांनी सांगितले.
—————————— —–
* कोनसरीच्या नागरिकांनी घेतला गोंडपिपरीचा आदर्श :-
गोंडपिपरी एमआयडीसीला “स्टेटस को” मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांत पसरला.ही वार्ता गडचिरोलीत पसरली.तेथील शेतकऱ्यांनी गोंडपिपरीचा आदर्श घेतला.कोणसरी परिसरातील शेतकऱ्यांनी अँड.दीपक चटक आणि अँड.बोधी रामटेके यांच्याशी संपर्क साधला.या युवा वकिलांच्या माध्यमातून आता गडचिरोलीतील आवाज बुलंद होणार आहे.
—————————— ——-
* ….अन्यथा गावबंदी ;
खासदार धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांनी गोंडपिपरी एमआयडीसी बाबत भूमिका स्पष्ट करावी.भूमिहीन आणि तिळमात्र संबंध नसतांना केवळ चमकोगिरीसाठी पुढेपुढे करणाऱ्यांना सोबत घेऊन चालवलेली आटापिटा थांबवावी,अन्यथा विद्यमान आमदारासारखे आपणासही गावाबंदी करू,असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.






















