Home महाराष्ट्र *राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन;...

*राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन; खासदार, आमदारांसह नेत्यांची मोठी उपस्थिती*

8
*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत भजनाने रंगले आंदोलन; अबीर-गुलाल उधळत पांडुरंग गायले*  
चंद्रपूर : अयोध्या श्रीराम मंदिर देणगी संदर्भात समोर आलेले आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराचे गंभीर आरोप अत्यंत चिंताजनक असून भक्तांच्या आस्थेचा आणि विश्वासाचा आदर राखला गेलाच पाहिजे, या मागणीसाठी चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तीव्र ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन छेडण्यात आले. चंद्रपूर येथील ऐतिहासिक अंचलेश्वर मंदिर येथे सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ रोजी या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, ही मागणी लावून धरली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या पवित्र नावाचा वापर करून चाललेली लूट थांबवण्यासाठी आणि आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी या उद्देशाने काँग्रेसने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस कमिटीने प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भक्तांकडून मोठ्या श्रद्धेने आलेली सुमारे करोडो रुपयांची चांदीची देणगी हिशोबात नसून ती बेपत्ता असल्याचा मुख्य दावा यात करण्यात आला आहे. तसेच, या गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे सुरक्षा सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड्स पुराव्यांशी थेट छेडछाड करत जाणूनबुजून डिलीट किंवा गहाळ करण्यात आले आहेत. यासोबतच, भक्तांकडून अनेक रोख देणग्या स्वीकारताना कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नाही, ज्यामुळे एकूण मालमत्तेचा ताळमेळ पूर्णपणे अस्पष्ट झाला आहे.
आंदोलनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः भजन गात आणि कार्यकर्त्यांनी ‘अबीर-गुलाल उधळीत रंग’ च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. त्यानंतर आंदोलनाच्या वतीने स्थानिक ठाणेदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “भारतातील कोट्यवधी जनतेच्या धार्मिक भावना आणि अढळ विश्वास प्रभू श्रीरामांशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित प्रत्येक व्यवहारात संपूर्ण पारदर्शकता असणे ही प्रत्येक रामभक्ताची अपेक्षा असून श्रीरामांच्या नावावर जनभावनांशी कुणालाही खेळू दिले जाणार नाही. जोपर्यंत सत्य पुढे येत नाही व दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील.”
या जाहीर सत्याग्रह आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने एकवटले होते. यावेळी प्रामुख्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, काँग्रेस नेते विनोद दातात्तत्र, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, घुग्गुस नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, घुग्गुस उपाध्यक्ष राजू रेड्डी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दिनेश चोखारे, सुभाष गौर, माजी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामनगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, स्वप्नील कामडे, शोभा वाघमारे, मीनाक्षी गुजरकर, शालिनी भगत, दीक्षा सातपुते, प्रतिभा पेंदाम, सुवर्णा लोखंडे, अतुल पिंपळकर, पायल दुर्गे, निधी पेंदाम तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या नावावर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांची तातडीने चौकशी व्हावी, अशी एकमुखी मागणी यावेळी सर्व उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली.