
चंद्रपूर(प्रतिनिधी) दि. 24/06/2026 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार STOP Diarrhoea अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि जनजागृती यावर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र तसेच सार्वजनिक ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येणार असुन, हे अभियान चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा . असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.
अभियानादरम्यान सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि साबणाने हात धुण्याचे महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. गावातील सर्व पाणीपुरवठा योजनांची तपासणी करून पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण, पाणी गुणवत्ता चाचण्या आणि Free Residual Chlorine (FRC) चे प्रमाण किमान ०.२ पीपीएम राहील याची खात्री केली जाणार आहे.
शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये Field Test Kit (FTK) द्वारे पाणी तपासणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित पाणी वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण नियमितपणे करून त्याची नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुविधांचा आढावा घेऊन गळती असलेल्या पाइपलाईनची दुरुस्ती, पाणी स्रोतांचे संरक्षण आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना स्वच्छता राखणे, सुरक्षित पिण्याचे पाणी वापरणे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अभियानाच्या माध्यमातून अतिसारजन्य आजारांवर नियंत्रण मिळवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. STOP Diarrhoea अभियान २०२६ चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह व जलजिवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.
























