
नागपूर/ वर्धा, दि. 31 ऑगस्ट 2026: सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प खर्चात स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ म्हणजेच ‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत नागपूर परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यांमधून एकूण 28 हजार 884 ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज सादर केले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 18 हजार 7 तर वर्धा जिल्ह्यातील 10 हजार 877 ग्राहकांचा समावेश आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या दुहेरी अनुदानामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत असून प्राप्त अर्जांपैकी 16 हजार 932 ग्राहकांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 11 हजार 229 आणि वर्धा जिल्ह्यातील 5 हजार 701 ग्राहकांचा समावेश असून या योजनेमध्ये प्रथम डिमांड भरणाऱ्याला प्राधान्य असून यासाठी ठराविक संख्या निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य आणि ठाराविक संख्या संपल्यानंतर अंदाजपत्रक तयार असले तरी अर्जदाराला शुल्काचा भरणा करणे शक्य होणार नाही याची इच्छूक ग्राहकांनी नोंद घेत या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शुल्काची रक्कम त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्राहकाचा सरासरी वीज वापर 100 युनिटपर्यंत असणे या योजनेसाठी बंधनकारक असून, केंद्र व राज्य शासनाच्या 80 ते 95 टक्क्यांपर्यंतच्या घसघशीत अनुदानामुळे लाभार्थ्यांना अतिशय नाममात्र खर्चात 1 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविता येणार आहे. यामध्ये 30 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्राहकांसाठी फक्त अडीच हजार रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील ग्राहकांसाठी केवळ 5 हजार रुपये तर इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 हजार रुपये इतकाच नाममात्र लाभार्थी हिस्सा निश्चित करण्यात आला आहे.
स्मार्ट रूफटॉप सोलर योजनेमुळे घरगुती ग्राहकांना दरमहा 100 ते 120 युनिटपर्यंत वीज पूर्णपणे मोफत मिळण्यास मदत होणार असून छतावर बसविण्यात येणाऱ्या या सौर पॅनलमुळे दिवसा तयार होणारी वीज थेट घरगुती वापरासाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे वीज बिलातील मोठी बचत होऊन ग्राहकांचा आर्थिक भार हलका होणार आहे. तसेच या माध्यमातून पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी होऊन पर्यावरणपूरक वीज वापराला मोठे प्रोत्साहन मिळणार असून, अंदाजपत्रक तयार झालेल्या सर्वच पात्र ग्राहकांनी कोणतीही प्रतीक्षा न करता आपले शुल्क त्वरित भरून या अत्यंत फायदेशीर योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर






















