
चंद्रपूर : वरोरा शहराच्या अगदी लगत असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) एकोना कोळसा खाणीत दररोज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास होणाऱ्या अत्यंत तीव्र ब्लास्टिंगमुळे वरोरा शहरातील ३ ते ४ वॉर्ड्यांमधील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. ब्लास्टिंगच्या कंपनांमुळे स्थानिक नागरिकांच्या घरांच्या भिंतींना मोठे तडे जाणे, प्लास्टर पडणे तसेच खिडक्यांचे नुकसान होणे अशा गंभीर समस्या सातत्याने उद्भवत आहेत. भविष्यात यामुळे मोठी दुर्घटना घडून जीवित व मालमत्तेची हानी होण्याचा धोका निर्माण झाल्याने परिसरातील त्रस्त नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे समस्येचे गांभीर्य मांडले.
नागरिकांच्या जीवाशी व सुरक्षिततेशी खेळणाऱ्या या समस्येवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यंत गंभीर भूमिका घेतली. “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची पहिली प्राथमिकता आहे, त्यामुळे कोळसा खाणीतील या बेजबाबदार ब्लास्टिंगवर तातडीने नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी बाधित घरांची प्रत्यक्ष पाहणी करून वैज्ञानिक तपासणी करण्याचे निर्देश दिले. नियमानुसार १५ टनांपर्यंतच ब्लास्टिंग करण्याची परवानगी असताना त्यापेक्षा जास्त स्फोटके वापरली जात असल्याची शंका आहे. ब्लास्टिंगच्या कंपनांची सामान्य तीव्रता ५०० मीटरपर्यंतच मर्यादित असणे अपेक्षित असताना, ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरोरा शहरापर्यंत ही तीव्रता कशी पोहोचते? या तांत्रिक बाबीची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती गठीत करण्यात येणार असून बाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या कार्यालयात वेकोलिचे उच्च अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तातडीची संयुक्त बैठक पार पडली. खासदार प्रतिभा धानोरकर व लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी नमते घेतले. “येत्या १५ दिवसांत वेकोलिचे अधिकारी वरोरा शहरातील ४ ते ५ वॉर्डांमध्ये विशेष पॅरामीटर्स लावून ब्लास्टिंगच्या कंपनांची आणि तीव्रतेची प्रत्यक्ष तपासणी करतील आणि भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल,” असे स्पष्ट आश्वासन वेकोलि प्रशासनाकडून देण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार कारण देवतळे, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कोटकर, वेकोलीचे क्षेत्रीय प्रबंधक राकेश प्रसाद, मुख्याधिकारी गजानन मेश्राम, अभय लोहे, नगरसेविका रोशनी भडके, नगरसेवक गजानन जीवतोडे, ॲड. गजानन बोढाले, ॲड. ए. आर. जांभुळे, डॉ. आशिष पिसे, प्रा. पिटगुलवार, आशिष ठाकरे, अरविंद जीवतोडे, डॉ. प्रमोद गंपावार, विजय झाडे, विनोद डोमकावळे, सुधाकर हनुमंते, अरुण झाडे, दशरथ सोनकुंमरे, छोटूभाई शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते






















