
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखिका वैशाली धनविजय-रामटेके लिखित ‘संस्कृती विकृती’ (कादंबरी) आणि ‘गॉगल’ (लघुकथासंग्रह) या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दि. १२ जुलै रोजी मा. सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वरोरा नाका, चंद्रपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार, रंगकर्मी तथा भारत सरकारच्या सॉंग अँड ड्रामा विभागाचे माजी उपसंचालक डॉ. नीलकांत कुलसंगे होते. मंचावर लोकनाथ यशवंत, प्रा. जावेद पाशा, डॉ. जयश्री कापसे, डॉ. इसादास भडके, खेमराज भोयर, प्रदीप देशमुख, लेखिका वैशाली धनविजय-रामटेके तसेच प्रशांत रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. नीलकांत कुलसंगे म्हणाले की, “मानवी मूल्ये जोपासणारे लेखकच राष्ट्राला वाचवू शकतात. लेखक आणि कवी समाजाला जागृत करण्याचे काम करतात. ज्या समाजात संवेदनशील साहित्यिक असतात, तो समाज कधीही मोडकळीस येत नाही.”
गॉगल या संग्रहातील दोन चार ओळीतील कथा माणसाला अस्वस्थ करणाऱ्या आणि मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या आहेत असे प्रतिपादन अभिनेता किरण माने यांनी केले.
डॉ. जयश्री कापसे यांनी ‘संस्कृती विकृती’ या कादंबरीचे परीक्षण करताना, सामाजिक अभियांत्रिकी (Social Engineering) या संकल्पनेचा प्रभावी वेध या कादंबरीतून घेण्यात आल्याचे सांगितले. बदलत्या सामाजिक वास्तवाचे आणि मूल्यसंघर्षाचे वास्तवदर्शी चित्रण ही या कादंबरीची जमेची बाजू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी साहित्याच्या इतिहासात प्रत्येक नव्या साहित्यप्रवाहाला सुरुवातीला विरोध झाला; मात्र परंपरेच्या चौकटी मोडणाऱ्या साहित्यिकांनीच स्वतःची नवी वाट निर्माण केली. वैशाली रामटेके यांनीही ‘गॉगल’च्या माध्यमातून “असेही लिहिता येते” हा विश्वास नवोदित लेखकांना दिला आहे. कथा, कविता, सामाजिक चिकित्सा आणि तत्त्वचिंतन यांचा अनोखा संगम असलेला ‘गॉगल’ हा मराठी साहित्यातील उल्लेखनीय प्रयोग असल्याचे गौरवोद्गार कवी लोकनाथ यशवंत यांनी काढले.
लेखिका वैशाली रामटेके यांनी ‘गॉगल’च्या माध्यमातून कथा आणि कवितेच्या पारंपरिक सीमांपलीकडे जाणारा अभिनव साहित्यप्रयोग साकारला असून, मराठी साहित्यात नव्या लेखनप्रकाराचे सृजन केले आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. जावेद पाशा यांनी केले.
प्रकाशनानंतर किरण माने, लोकनाथ यशवंत, डॉ. जयश्री कापसे, डॉ. इसादास भडके, खेमराज भोयर, प्रदीप देशमुख यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन्ही साहित्यकृतींचे स्वागत करून लेखिका वैशाली रामटेके यांना पुढील साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इरफान शेख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अपेक्षा पिंपळे यांनी केले, तर सीमा भसारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि वाचकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरला.
























