
जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रियेत निवड झालेल्या 423 नवनियुक्त शिक्षकांची कागदपत्र पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक असलेले शिक्षकांचे मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत नवनियुक्त शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेसह विविध आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. या पडताळणी प्रक्रियेत 2 उमेदवार अपात्र ठरले, तर 15 उमेदवार गैरहजर राहिले. पात्र उमेदवारांची पुढील नियुक्ती प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार राबविण्यात आली. दरम्यान, वर्ग 6 ते 8 तसेच माध्यमिक संवर्गातील 22 नवनियुक्त शिक्षकांना दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.
दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी उर्वरित 385 नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आले. समुपदेशन प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना उपलब्ध पदे, शाळा तसेच संबंधित संवर्गानुसार नियुक्तीबाबतची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यापैकी 5 शिक्षक समुपदेशनासाठी गैरहजर राहिले. समुपदेशनास उपस्थित असलेल्या 380 नवनियुक्त शिक्षकांपैकी 341 शिक्षकांना त्याच दिवशी नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.
प्रकल्पग्रस्त व दिव्यांग प्रवर्गातील उर्वरित नवनियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नियुक्ती आदेश वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित प्रवर्गातील उमेदवारांनाही लवकरच नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ताधारित निवड आणि नियोजनबद्ध समुपदेशनाला प्राधान्य देण्यात आले. नवनियुक्त शिक्षकांच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षकांची आवश्यकता काही प्रमाणात पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्येही अध्यापन व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला निश्चितच बळकटी मिळणार आहे.






















